Posts

उत्खनन

कालपटाच्या धाग्यामधले मोती लागले झरु परसामधला बहरलेला आठवू लागला तरु आयुष्याच्या संध्याकाळी डिवचून जातो वारा बघता बघता सरुन गेला सारीपाट सारा धुसर संध्या, विझत आली पणतीची या वात त्यावर करी सांज-सकाळी पखरण पारिजात  त्या वाड्याचे आंगण सुंदर ओंजळीत मज घेई कुठे कधीची हरवलेली माया स्पर्शुनी जाई भातुकलीच्या खेळामधला चंद्र माझा मामा काळ्या काळ्या रात्रीच्या जणू डोळ्यांमधला सुरमा डोळ्यांदेखत पाहिला त्याला नदीमध्ये बुडताना भातुकलीच्या चुल्हावरती हात माझा पोळताना तिमिरकाळी प्रत्येकवेळी पाखरु रिझवत होते  मलयगिरीच्या वा-यासंगे आठवण दाटून येते त्याची किलबिल स्फुंदत होती कळले नाही मला इटाळाचा काटा उरी बोचत होता त्याला चिरेबंदी वाड्याच्या तो उंबरठ्यावर उभा  स्त्रवत होता नयनांदाटे अस्फुट माझ्या दंभा पंख पसरले, मुक्त झाला ! घिरट्या घालत राहिला मी अभागी ! पंख कापले, चांद पाण्यात पाहिला तुटत चालला धागा माझ्या देहाचा नि प्राणांचा खंडित झाला रास फुलांचा ; रंगांचा नि गंधांचा डोकावताना मागे दिसतो पुन्हा चंद्रमा पुनवेचा बुडेल कदाचित तो ही अवचित ध्यास लागला घाटाचा - निखिल ...

होड्या दूर निघाल्या

अनिमिष नयनांच्या कृष्ण-कडा दाटल्या यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या ॥ध्रू॥ तम विभोरतराच्या अंती जिथे नदी सागरा भेटी टाकून मागूती नाती राखेत अग्नीच्या उष्मा साऱ्या लोपल्या यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥१॥ दूर क्षितीजाची दारे भासती परकी सारे मलयाचलाचे ही वारे दाहती कुमुदकाया आर्त शिणलेल्या यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥२॥ भक्कम पूर्वीचे भाव-तट साश्रू नयनांनी ओलावत नावा तरी पुढेच जात करत व्यथित दशदिशा मावळल्या यमुनेच्या डोहातून होड्या दूर निघाल्या॥३॥ - निखिल बिरमल-डागर 

दिशाहीन

काळोखले मार्ग माझे हरवल्या या दशदिशा रिक्त घरट्याची पुन्हा भासते मज दुर्दशा  फुका हा संघर्ष माझा संग्राम खोटे जाहले नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले॥ध्रू॥ कुठे पहावा किरण पुंज कुठे दिसावा सन्मार्ग रे दिशाहिन पान्थास केवळ हात तुझा हाती दे सुज्ञ- प्राज्ञ मती दाहते मानवांच्या काननी मीच माझी मी न राहिले आप्त सारे त्यागुनी वादळी वाटेत राज्ञी एकटी मी राहिले नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले ॥१॥ नीर नयनी क्षीर झाले कष्टी मी एकांतवासी आयुष्याची सुरू भैरवी मीच माझी होय दासी वेदना या पर्वतासम फुटेल का पण यास पान्हा  या ही जन्मी, जनोजन्मी तुच माझी बनूनी रहा ना  पातकाच्या थारोळ्यात मी घोट विषाचे घेतले नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले॥२॥

स्वयंसूक्त

सूर्य तो प्रचण्ड तप्त शांत चंद्रिकाही मी मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निकाही मी ॥ध्रू॥ पृथ्वी-तेज-आप-अग्नि मीच व्याप्त व्योमनी शर-पशु-निषाद बनुनी हिंडतो मी काननी सृजन-तपन-विलय कर्मी तृतीय नेत्रिका ही मी मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥१॥ मी बनुनी शंकराच्या करी त्रिशुल तिष्ठलो मीच गदा-शंख-चक्र हरीमय जाहलो श्रीप्रिया अधरधरा मुक्त सानिका ही मी मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥२॥ सृजनाचा आरम्भ मीच मीच ब्राह्मी कामिनी  कणाकणात स्पंदणाऱ्या प्रदीप्त मीच गर्भिणी  थाप मी मृदंगाची धूंद नृत्यकर्मी मी मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥३॥ ताण्डवात तप्तलेली त्यागमूर्ती शोणिता शाम्भवी ही मीच तो सुरम्य रम्य शाश्वता भोक्ता-भोज्य-भोज्यदा, क्षुधा भोजनात मी मीच धृत-भस्म-काष्ठ दीप्त अग्निका ही मी॥४॥

धाव रे केशवा

Image
माखलेले गात्र। रेशमाचे सूत्र। घेऊनी गे पात्र। धाव माये॥ देहाचिया डोहा। झाकोळले मोहा। तुच महीरूहा। देई छाया॥ चन्द्रमेसी डाग। चन्दनासी नाग। विरहाची आग। पूरे पांडूरंगा॥ जगाचा वणवा। कसा मी सहावा। धाव रे माधवा। तारी जीवा॥  श्वापदांचे रान। तुच एक त्राण। चाप आणि बाण। कुठे अर्पिलेसी॥ काळोखले द्वार। वेदनेसी ज्वार। शाश्वत आधार। एक पांडुरंग॥ - निखिल बिरमल २८/०१/२०२२

शतजन्मीचा -हास

रजनी नीरजा ओज मधुर मुक्त रे वाटे समजूनी क्षीर तया बाल-मुग्ध रे चाटे होऊनी भ्रमनिरास पाहत अन् जरा वरी तश्यात आत नकळत घुसत बाण अन् उरी कसा कुणी आजि न अवगता घेतला घास जरी उरी शर्वरी करी राहिला शतजन्मीचा ह्रास -निखिल बिरमल

क्षीर सांडले आहे

रंगमहाली बंदिस्त माझे प्राण कोंडले आहे बाहेर तिकडे चंद्रानेही क्षीर सांडले आहे कधी सकाळी वारा सारा देह स्पर्शुनी जातो कुठे पलिकडे झुरता झुरता तारा निखळुन पडतो लुकलुकणा-या गोड तारका उगाच हसवुन जाती तिमिराचे हे तेज पाहूनी नयन भरुनी येती जाई-जुईचे रंगीत गंधित परस हरवले आहे बाहेर तिकडे चंद्रानेही क्षीर सांडले आहे - निखिल बिरमल