उत्खनन

कालपटाच्या धाग्यामधले मोती लागले झरु
परसामधला बहरलेला आठवू लागला तरु
आयुष्याच्या संध्याकाळी डिवचून जातो वारा
बघता बघता सरुन गेला सारीपाट सारा

धुसर संध्या, विझत आली पणतीची या वात
त्यावर करी सांज-सकाळी पखरण पारिजात 
त्या वाड्याचे आंगण सुंदर ओंजळीत मज घेई
कुठे कधीची हरवलेली माया स्पर्शुनी जाई

भातुकलीच्या खेळामधला चंद्र माझा मामा
काळ्या काळ्या रात्रीच्या जणू डोळ्यांमधला सुरमा
डोळ्यांदेखत पाहिला त्याला नदीमध्ये बुडताना
भातुकलीच्या चुल्हावरती हात माझा पोळताना

तिमिरकाळी प्रत्येकवेळी पाखरु रिझवत होते 
मलयगिरीच्या वा-यासंगे आठवण दाटून येते
त्याची किलबिल स्फुंदत होती कळले नाही मला
इटाळाचा काटा उरी बोचत होता त्याला

चिरेबंदी वाड्याच्या तो उंबरठ्यावर उभा 
स्त्रवत होता नयनांदाटे अस्फुट माझ्या दंभा
पंख पसरले, मुक्त झाला ! घिरट्या घालत राहिला
मी अभागी ! पंख कापले, चांद पाण्यात पाहिला

तुटत चालला धागा माझ्या देहाचा नि प्राणांचा
खंडित झाला रास फुलांचा ; रंगांचा नि गंधांचा
डोकावताना मागे दिसतो पुन्हा चंद्रमा पुनवेचा
बुडेल कदाचित तो ही अवचित ध्यास लागला घाटाचा

- निखिल बिरमल

Comments

Popular posts from this blog

मुक्या कळीला फुटले हासू....