दिशाहीन
काळोखले मार्ग माझे हरवल्या या दशदिशा
रिक्त घरट्याची पुन्हा भासते मज दुर्दशा
फुका हा संघर्ष माझा संग्राम खोटे जाहले
नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले॥ध्रू॥
कुठे पहावा किरण पुंज कुठे दिसावा सन्मार्ग रे
दिशाहिन पान्थास केवळ हात तुझा हाती दे
सुज्ञ- प्राज्ञ मती दाहते मानवांच्या काननी
मीच माझी मी न राहिले आप्त सारे त्यागुनी
वादळी वाटेत राज्ञी एकटी मी राहिले
नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले ॥१॥
नीर नयनी क्षीर झाले कष्टी मी एकांतवासी
आयुष्याची सुरू भैरवी मीच माझी होय दासी
वेदना या पर्वतासम फुटेल का पण यास पान्हा
या ही जन्मी, जनोजन्मी तुच माझी बनूनी रहा ना
पातकाच्या थारोळ्यात मी घोट विषाचे घेतले
नौका माझी सागरी तिज वादळाने घेरले॥२॥
Comments
Post a Comment