देशजननीचे गीत
दशायुधे घेऊनी दशकरांत दिव्य निघाला रथ देवीचा
तपस्विनी ही तेजस्विनी कशी झाली! चमत्कार दैवाचा
मागे तेजोवलय अन् सप्ताश्व रथावर पडे सुमनांचे सडे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे।। १।।
तव नेत्रांच्या थेंबांनी भिजली भूमी सारी
घेऊन शस्त्र करी कर आघात रिपूवरी
पाहुयात निष्ठुर अरि-रुधिराचा अभिषेक कैसा घडे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे।।२।।
तव स्वेदगंगेतून माते, स्वातंत्र्यक्षितीज बघ जन्मले ते
या नवस्वातंत्र्यारुणाला चल रिपू-रुधिराचे अर्घ्य दे
पाहूनी शौर्य तुझे रणांगणी गनिम-हृदय धडधडे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे।।३।।
तुझ्या अश्वटापांच्या नादातूनी चैतन्य नांदे त्रिभुवनी
तुझ्या रथ कापल्या मार्गातूनी उपजे नव-संजीवनी
पाहूनी रणक्रिडा राणी तुझी नभी ही चौघडे झडे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे।।४।।
घेऊनी दशकरी दशशस्त्र मोकळे अन् तें केश सोडले;
तव नृत्याघात साहूनी भवानी महामेरू-मंदार ढासळले
तुझ्या अग्निस्त्रावी नेत्रांतून मुक्त अग्निपंख फडफडे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे ।।५।।
माते, सानिकेच्या मधुर नादातही मज दुदुंभी ऐकू ये
मारण्या एकचि रिपू सारी पेटून उठली हिंद-हृदये
दिशादिशांवर फेकित तेजा तुझ्या कांतीसम सहतारे
तोडण्या श्रृंखला अमर्याद दशभुजा सरसावे पुढे।।६।।
उगवले आरतीस तुझ्या नवक्षितीज तोडुनी बंधने सारी
मुक्त झाली! ही बंदिस्त!! मम जन्मभू प्यारी!!
पण नयनी थेंब तराळले पाहूनी आरामाने अंकी
चिर-निजलेला बांधव अन् चेहर्यावर तव पदर तिरंगी ।।७।।
-निखिल बिरमल
१५/८/२००७
Comments
Post a Comment